धाराशिव प्रतिनिधी :–
लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या बेदम मारहाणीचा धाराशिव येथे तीव्र निषेध करण्यात आला. छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर धडकले.
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयासमोरील बॅनर फाडले. काही काळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली.
छावा संघटनेच्या नेत्यांनी हा प्रकार निषेधार्ह असून, लोकशाहीत असं दडपशाहीचं राजकारण खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा दिला आहे. लातुरातील मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर तत्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सदर प्रकरणामुळे दोन्ही गटांमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला असून पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे. प्रशासनाने दोन्ही गटांमध्ये समन्वय ठेवत कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.