धाराशिव / प्रतिनिधी : –
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ कर्मचारी असलेल्या अव्वल कारकून दिपक चिंतेवार याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून, त्याला निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा खाजगी दलाल म्हटले जात आहे. प्राप्त तक्रारीनुसार, चिंतेवार याने प्रशासकीय बदल्यांमध्ये दलाली, कर्मचाऱ्यांकडून आर्थिक व्यवहार, महिला कर्मचाऱ्यांचे शोषण आणि इतर अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
तक्रारीत असेही नमूद आहे की, शोभा जाधव यांचे सर्व व्यवहार चिंतेवारच हाताळतो, आणि तो स्वतःला जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी (RDC) यांचा “राईट हँड” असल्याचे सांगतो. बदल्यांच्या काळात त्याला आस्थापना विभागाचा नायब तहसीलदार म्हणून पदभार देण्यात आला होता, ज्याचा उपयोग त्याने बदल्यांसाठी पैसे गोळा करण्यासाठी केल्याचा आरोप आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चिंतेवारचा पगडा इतका वाढलेला आहे की, कोणीही त्याच्या विरोधात बोलले तर त्यांची बदली, अपमान किंवा निलंबनाची कारवाई होते. अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले की, शोभा जाधव त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून “हप्ता” मागतात आणि न दिल्यास निलंबनाची धमकी देतात.
दलाली, हप्ता व दबावामुळे महसूल विभाग त्रस्त
या प्रकारामुळे महसूल विभागात भीतीचे वातावरण तयार झाले असून, कर्मचारी मानसिकदृष्ट्या त्रस्त असल्याचेही निदर्शनास आले आहे. चिंतेवार याने गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातच विविध आस्थापनांमध्ये बदल्या करून स्थान टिकवले आहे. शासनाच्या बदली धोरणाचा त्याला अपवाद का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.राजकीय इशारा – दलाली थांबवा अन्यथा आंदोलन
या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) च्या वतीने मा. परिवहन व पालकमंत्री प्रताप सरनाईक, तसेच जिल्हाधिकारी यांना पत्र सादर करून दिपक चिंतेवार याची तत्काळ इतर तालुक्यात बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, शोभा जाधव व दिपक चिंतेवार यांचे भ्रष्टाचाराचे फोटो व पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीररित्या प्रदर्शित करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.प्रशासनाकडून चौकशी होणार का?
हा विषय आता केवळ तक्रारीपुरता न राहता राजकीय व प्रशासकीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. सामान्य नागरिकांमध्ये तसेच कर्मचारी वर्गात संताप असून, प्रशासनाने या गंभीर आरोपांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.