धाराशिव, ७ जुलै :-
लोहारा तालुक्यातील खेड गावात पंधरावा वित्त आयोग व नवबौद्ध/अनुसूचित जाती विकास निधीचा गैरवापर करत संबंधित अधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे शासनाची लाखों रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, कनिष्ठ शाखा अभियंता यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी संगनमत करून रस्ते, नाली, विद्युतीकरण, शाळेच्या कंपाउंड वॉल व पाण्याची पाईपलाईन यांची कामे प्रत्यक्षात न करता केवळ बिलांद्वारे निधी उचलल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे अनुसूचित जातींच्या विकासाला खो घालण्यात आला असून, या भ्रष्टाचाराच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते बाबुराव कांबळे यांनी आज जिल्हा परिषद कार्यालय, धाराशिव येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरत) शाखेचा जोरदार पाठिंबा मिळाला असून, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, तालुका अध्यक्ष संपत सरवदे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य सौ. जया कांबळे, धोंडीराम बनसोडे, दिलीप कांबळे, शिवाजी गायकवाड, किशोर भालेराव, सुदर्शन गव्हाळे, गौतम गायकवाड यावेळी उपस्थित होते.
या गंभीर प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरत) तर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची गंभीर दखल घेऊन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून निधी वसूल करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.