जळकोट प्रतिनिधी :-
जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर येथे आषाढी एकादशीनिमित्त गावातून विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी काढण्यात आली. यावेळी झालेल्या रिंगण सोहळ्याने अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यामुळे जळकोटमध्ये विठ्ठलनामाची ‘शाळा’ भरल्याचा भास होत होता. विठ्ठलभक्तीची गीते, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, टाळृ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलनामाच्या गजराने जळकोटनगरी दुमदुमली. आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर येथे बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः विठुरायाच्या मूर्तीचे व पालखीचे पूजन मुख्याध्यापक महामुनी मॅडम व अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती मल्लिकार्जुन कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रिंगण साकारले. टाळ मृदूंगाच्या तालावर ज्ञानोबा तुकारामचा विद्यार्थ्यांनी गजर केला. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी भक्ती गीतावर आकर्षक नृत्य सादर केले. तसेच फुगडी ही धरली.यानंतर जळकोट गावातून भगव्या झेंड्यांसह सवाद्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीत विद्यालयातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विठ्ठल-रूक्मिणी, संत यांच्या वेशभूषेसह विणेकरी, वारकऱ्यांच्या वेशात दिंडीत सहभाग नोंदवला. गावातील मुख्य रस्त्यावरून फिरून दिंडी संत गोरोबा काका मंदिरात आली. तेथे विठुरायाचे व गोरोबाकाकाचे दर्शन घेऊन दिंडीची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शलेय समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार व उपाध्यक्ष शकील मुलाणी हे उपस्थित होते. हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी महामुनी मॅडम, रेणुके मॅडम, इटकरी सर, अभिवंत सर, वनवे सर, मुरमुरे सर, कुडकले सर, आहेरकर सर व श्रीकांत कदम सर यांनी प्रयत्न केले.